Posted by Sagar Kulkarni

#सकाळ 


एका प्रसन्न सकाळी जेव्हा डोळे किलकिले करावे, 

तेव्हा समोर तुझा शांत झोपेतला चेहरा समोर असावा..

तप: साधनेत मग्न योग्याच्या चेहऱ्यावर जे शांत, गूढ भाव असतात, 

तसेच तुझे शांत भाव मी भान हरपून बघत राहावं.. 

पहाटे उमलायला झालेली गुलाबाची कळी तिचा वेळ घेत सावकाश आपलं गुलाबी सौन्दर्य खुलवत असते.. 

तिच्या उमलण्याशी स्पर्धा करणारे तुझे अबोल ओठ मी पाहत राहावे.. 


काळ्याशार नागिणीसारखे तुझे घनदाट केस अस्ताव्यस्त पसरलेले असतात..

पण त्या अस्ताव्यस्तपणातलं सळसळतं सौन्दर्य निव्वळ अप्रतिम असतं.. 


कमळाच्या कळीसारख्या असणाऱ्या तुझ्या पापण्यांचे पडदे उघडण्याची मी वाट बघावी, आणि मनात सूर्याला प्रार्थना करावी कि अजून थोडावेळ ही पहाट अशीच रेंगाळत राहू दे... 



तू हळूच तुझे डोळे उघडावे...तुझे अर्धोन्मीलीत डोळ्यांत असणाऱ्या काळ्याभोर बाहुल्यांच्या काळ्या जादूचा गहिरा असर माझ्या आयुष्यावर कायम असावा..


अगदी पहिल्या भेटीसारखाच.. माझी सकाळ अशीच व्हावी...शांत... तृप्त...तरीही अतृप्त..!! 



 - © सागर कुलकर्णी

This entry was posted on Monday, February 11, 2019 at 20:24 . You can follow any responses to this entry through the comments feed .

0 comments

Post a Comment